रविवार, २० मार्च, २०११

कात्रज बोगदा -- सिंहगड NIGHT Trek

"आरे कुठे आहात....आम्ही पोहोचलोय कात्रज डेपो ला" असा फोन आला.आम्ही [ मी आणि सौरभ ] ९:१५ ला कात्रज डेपो ला पोहोचलो.पाटील (अमित),अमेय,संदीप,राजेंद्र,हर्षद.संदीप चा एक मित्र आणि दवे [ प्रशांत ला त्याच्या नावाने खूप कमी लोक ओळखतात ]."अभिजित कुठे आहे?" एक प्रश्न. "आरे अभ्या येतोय.स्वारगेटहून निघताय ते. त्याच्या सोबत कोणी १-२ मित्र आहेत म्हणे".म्हणून आम्ही तो पर्यंत बस किंवा जीप ब्गाहायला गेलो.डोक्यात विचार होता कि ११-१२ लोक आहेत.एका जीप ला बुक केले आणि सांगितले कि १२लोक आहेत ८-९ हजर आहेत ४-५ येत आहेत.बिचाऱ्याने जीप थांबवली पण नंतर कळले कि अभिजितचे मित्र आणि त्यांचे अजून काही(?) मित्र येत आहेत.मग मात्र आम्ही जीप मध्ये बसलो आणि कात्रज बोगद्यला भेटायचे ठरले.


कात्रज बोगद्या जवळ उतरलो तर दिसले कि आधी-च तिथे वेग-वेगळ्या कंपन्यांची ४०- ५० लोक जमले होते आणि त्यात पडली आमची भर."काय नाईट ट्रेक का?"..अनोळखी काका-नि प्रश्न विचारला. "हो" आमचे उत्तर."वा...रस्त्यात भेटू-च". आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नक्की कुठून वर जायचे ते बघत होतो.आमच्या मागून उरलेले मित्र आले. (रात्रीचे १०:१५). आम्ही निघण्याचा निर्णय घेतला.

आलेल्या मित्रांमधून २-३ लोकांनी हा ट्रेक आधी केला होता त्यामुळे अचानक-च त्यांनी लीड घेतला.रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पायवाटेने आम्ही निघालो.तितक्यात आवाज आला "KPIT team stay back !!".त्यांना फक्त त्यांच्या लोकांना थांबवायचे होते.आमच्यातून आवाज गेला "कोणाला KPIT ला apply करायचे आहे का रे?...इथे-च resume द्या " सगळे हसलो आणि पुढे एका उंचवट्यावर आलो.सगळे जमले आणि आमचे २ लीड आम्हाला काही सूचना देत होते."एक-मेकांचे चेहेरे नीट बघून घ्या"..."कोणी कोणी हा ट्रेक आधी केलाय?".."कोणाचा हा पहिला-च ट्रेक आहे"...२-३ हात वर गेले (मी तसा मोठे ट्रेक कधी-च केला नाही.साधा सिह्गड पण चढलो नाहीये पण तरी हात खाली-च ठेवला कारण मला जे कळायचे होते ते कळले होते :-) ) मग त्यांना ग्रुप च्या सोबत राहण्यास सांगण्यात आले.चला निघू आता. "हिंदवी स्वराज्य संस्थापक....सिहासानाधीश्वर...महाराजाधिराज...छत्रपती शिवाजी महाराज कि...जय !!!!" अशी घोषणा झाल्या नंतर आम्ही चढाई सुरु केली.मनात कुठे तरी असे वाटत होते कि आज रात्री आपल्याला त्या काळामधल्या लढाया,घोड्यांचे मार्ग,रात्री चे आक्रमण ह्याचा - अगदी तासाच्या तसा नाही पण तरी... - एक अंदाज तरी येईल.
चढाई सुरु केल्या नंतर सौरभ आणि पाटील झपाझप पावले टाकत पुढे निघाले [ ते शेवट-पर्यंत ].मी ,दवे,हर्षद मध्ये होतो आणि बाकी चे लोक मागून येत होते. ४००-५०० मीटर गेल्या नंतर पहिल्या टेकडी च्या माथ्यावर एक मंदिर होते तिथून आम्ही ४-५ लोक पुढे निघालो.पुढे तर रस्ता-च बंद.अमेय पुढे रस्ता बघायला गेला.तितक्यात मागून २-३ आवाज आले " आरे इकडे या तिकडे कुठे जाताय ?" मग कळले हि हा रस्ता नाहीये.तसे सांगायचे तर ह्या ट्रेक ला निश्चित असा रस्ता नाही-च.कुठे तरी दूर वर सिहागादाचा लाल रंगाचा मोबाईल तोवर चा लाईट दिसतो त्याला बघून चालत राहायचे इतकेच(?).मग आम्ही ४-५ लोक परत मागे आलो आणि मंदिराजवळ पुन्हा सगळे जमले.Head Count होता २२ !. मंदिराला लागून-च एक छोटीशी पायवाट जाते तिथून सगळे निघाले.
पहिली टेकडी चढताना-च दुसरी टेकडी समोर अंगावर आली.तेव्हा जरा नवीन नवीन दमाचे होतो त्यामुळे अर्धी टेकडी भराभर चढून गेलो आणि मग लक्षात आले कि नसता जोश इथे कामाचा नाही.तिथे-च बसलो तेवढ्यात अमेय,हर्षद ,दवे आले आणि आम्ही थोडे पाणी घेतले.तेवढ्यात वरून पाटील ने Torch ने सिग्नल दिला "आम्ही इथे पोहोचलो तुम्ही ह्या मार्गाने या" अश्या काहीश्या अर्थाचा तो सिग्नल होता.पुन्हा उठून चालू लागलो.कधी एकदा हि टेकडी संपले असे झाले होते पण अजून तर ६ तास असे-च चालायचे होते.खरे सांगायचे तर ह्या ट्रेक ला जाण्यापूर्वी सगळ्यांना ह्याची कल्पना देण्याची गरज आहे कि तुम्हाला ६-८ तास कुठल्या परिस्थितीमध्ये चालायचे आहे आणि परत फिरण्याचा काही एक मार्ग नाही.मला कोणी-हि न सांगता ह्याची खरी कल्पना पहिली टेकडी गेल्यावर-च आली. :)
तिथून मात्र पुढे थोडा उतार होता आणि मग थोडे पठार ( त्यातल्या त्यात ) लागले.इथे सरळ चालतांना थोडे बरे वाटले.तिथून चंद्र खूप चान दिसत होता.आम्ही एकदा बाजूला गेलो जिथून अगदी हिंजेवाडी पासून ते कात्रज पर्यंत पूर्ण पुणे शहर दिव्यांनी उजळलेले दिसत होते.थोडा वेळ थांबून तिथे काही फोटो घेतले आणि पुढच्या मार्गाला लागलो.पठार संपले आणि पुढे आम्ही पाटील आणि सौरभ ला आवाज दिला पण परतून कोणी आवाज दिला नाही.थोडे पुढे जाऊन कळले कि तिथे एक उतार होता जिथून आम्हाला सरळ खाली उतरायचे होते.पुढची मंडळी आधी-च उतरली होती आणि खालून सिग्नल देत होती.खाली उतरायला सुरुवात केली तर तिथे खडक आणि निसरडी जमीन आणि त्यातून अतिशय चिंचोळा मार्ग.तिथे लक्षात आले कि माझे sports shoes काही कामाचे नाहीत.सतत घसरत होतो.माझ्या मागून अन्नी ( आमच्या कंपनी मधला नवीन मुलगा) ,हर्षद आणि दवे येत होते.त्यांना सुद्धा जरा सांभाळून येण्यास सांगितले.डाव्या बाजूला टोर्च मारल्यावर कळले कि खालपर्यंत पूर्ण उतार होता आणि त्याबाजूला जाणे धोकादायक होते.कसे तरी घसरत-घसरत खाली गेलो तर मागून दवे घसरून पडल्याचा आवाज आला.दवे पूर्ण ट्रेक मध्ये बर्याच वेळा घसरला पण परत उठून तितक्याच दमाने पुढे आला.पुढच्या २ टेकड्या आम्ही लवकर पार करून गेलो आणि तिसर्या टेकडी जवळ आम्हाला आमच्या पुढे असलेला ग्रुप मिळाला.तिथे आम्ही जाण्याच्या आधी-च राजेंद्र ने आणलेली भेळ उघडण्यात आली होती.मस्त गार वारा,कांदा-टमाटा घातलेली भेळ थोडे पोहे असे एकत्र करून सगळ्यांनी थोडे थोडे खाल्ले आणि काही वेळ मागचे लोक येईपर्यंत थांबलो.वेळेत सिह्गड गाठायचा असल्यास जास्त वेळ थांबता येणार नाही म्हणून आम्ही निघालो.काही लोकांनी तिथे-च अजून थोडे थांबायचे ठरवले.गार हवा आणि पोटात थोडे गेल्यानंतर चालायला थोडा उत्साह वाढला.पुढच्या २ टेकड्या पार केल्यानंतर आमचे पुन्हा २ ग्रुप झाले.इथे एका टेकडी वर चढतांना ५०-७० फुटाचा जरा जास्त तिरका चढाव होता तिथे खडकावरून चढताना पायात थोडे गोळे आले पण वर गेल्यानंतर थोडे थांबलो त्यामुळे जास्त त्रास झाला नाही.इथे मात्र अमेयच्या पायात cramp आला होता.थोडा spray मारल्यामुळे त्याला दुखणे कमी झाले ( किंवा सहन करण्याजोगे झाले ).अमेय,मी,दवे,हर्षद आणि अन्नी मागे आणि राजेंद्र,सौरभ,पाटील पुढे असे चालू लागलो.थोड्याथोड्या वेळाने आवाज देऊन सिग्नल घ्यायचो आणि चालायची दिशा ठरवायचो.आणि पुन्हा एक उतार आला.उतार जितका जास्त तितके पुढे जास्त चढावे लागणार म्हणून धडकी भरायची.उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे माती अतिशय कोरडी झालेली आणि त्यामुळे खूप पाय घसरत होते(माझे तरी).मग रस्ता सोडून थोडे गवतावरून चालायचे ठरवले त्यामुळे चालायला मदत झाली.एका उंचवट्यावर मागचे २-३ लोक ,मी,अमेय,हर्षद थांबलो होतो.तितक्यात विचित्र आवाजाकडे आमचे लक्ष गेले आणि आम्ही शांत झालो.थोड्या वेलापुर्वीचा आमचे त्या विषयावर बोलणे झाले होते कि ह्या वाटेत घुबड,साप दिसतात आणि कधी-कधी तरस दिसण्याची शक्यता असते.पण आवाजावरून तर कोणता तरी पक्षी असावे असे वाटत होते.कधी कधी चित्त्याची पिल्ले किंवा मादी पण असा आवाज करते ( Discovery channel चा दुष्परिणाम !!) असो.त्या आवाजाने शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली पण कळले नाही कि कोणता प्राणी होता.आम्ही हा उतार उतरून पूर्ण केला.अमेय,पाटील आणि राजेंद्र आधीच पुढे गेले होते.ह्या वेळेस थोडे जास्त-च खोल आलो होतो आणि पुढची टेकडी आ वासून उभी होती.रस्ता काही कळत नव्हता आणि त्यात चंद्र दुसर्या बाजूस गेल्यामुळे अंधार आला होता.टोर्च लावला कि पाटील आणि सौरभ ची चिडचिड व्हायची ( तेवढाच मला चाळा !! ).पण इलाज नव्हता.मी आणि अन्नी हळू हळू चडत होतो तितक्यात आमच्यापासून १०० मीटर वरून दाट झाडीमाडून टोर्च दिसला आणि कळले कि आम्हाला तिथून जायचे होते.हा पूर्ण रस्ता झाडीमधून सरळ वर चढण्याचा होता आणि कुठेही पायवाट दिसत नव्हती तसे-च चढून वर गेलो आणि मग पूर्ण ग्रुप सोबत पुढच्या पठारावर चालायला लागलो.पुठे एक टेकडी अजून होती आणि चढण्याचा कंटाळा आला होता म्हणून आम्ही तिला वळसा घालायचे ठरवले.पुढचे २-३ लोक रस्ता बघत बघत जात होते.नेटवरच्या माहिती मध्ये स्पष्ट सांगितले होते कि त्रास झाला तरी टेकड्यांना वळसा घालू नका आणि इथे-च थोडा घोळ झाला आम्ही ६-७ लोक एका बाजूला आणि मागून येणारे टेकडीवर.थोडा वळसा घालून गेल्यानंतर कळले कि आपण खाली खाली जातोय मग आम्ही तिरक्या दिशेने वर जाण्याचे ठरवले.रात्रीच्या अंधारात असा मार्ग शोधणे जरा खडतर होते पण शेवटी ट्रेक ची मजा त्यात-च आहे.इतक्यात उजव्या बाजूने आवाज आला"हेल्लो...कोण आहे रे?"..मी "ओ" दिली..उत्तर आले "ओ काय देतोय नाव सांग कोण संदीप आहे का रे ?"...संदीप ने त्याला होकार दिला मग वरच्या ग्रुप ने आम्हाला सरळ यायला सांगितले.आम्ही थोडे चढून वर गेलो आणि वळसा घालून पठारावर पोहोचणार होतो.इथे अमेय ची परिस्थिती जरा जास्त-च गंभीर बनत होती.पुन्हा एकदा स्प्रे मारून आम्ही हळू हळू निघालो आणि पठारावर सगळे एकत्र आलो.

पहाटेचे २:३० वाजले होते,आम्ही सगळे खाली उतरून एका दगडावर बसलो होतो,दवे पुन्हा १-२ वेळा घसरून आला होता.थोडे पाणी घेऊन चोकलेट खाऊन आम्ही निघालो.पुन्हा २-३ ग्रुप झाले मी आणि अन्नी-च राहिलो.दवे,हर्षद आणि अमेय मागून येत होते.एका चढवावरून पुढे दिसले कि त्यापेक्षा जास्त उंच टेकडी पुढे आहे आणि तिथून टोर्च येतोय.त्या वेळेस पाय थकले होते पण आता जायचे-च होते म्हणून थोडा चालण्याचा वेग कमी केला.त्या टेकडी च्या माथ्यावर पुढचे ३-४ लोक [ इथे नंदू म्हणून एक नवीन मित्र मागून आला होता ] आणि आम्ही दोघे पुन्हा जमलो आणि पुन्हा एकदा टेकडी ला वळसा घेण्याचे ठरले.इथे मात्र निर्णय चुकला [ किंवा कदाचित बरोबर होता कारण पुढे जाऊन आम्हाला डांबरी रस्ता-च मिळाला ]. २ टेकड्या होत्या ज्यांना आम्हाला वळसा घालायचा होता म्हणून आम्ही मागच्या बाजून चालायला सुरुवात केली.कुठेही नीट अशी पायवाट नव्हती.पूर्ण रस्ता आम्ही झाली,गवत ह्यातून कच्ची पायवाट पकडून पुढे गेलो.आणि शेवटी कळले कि पुढे जाणे-च शक्य नाही.२-३ वेळा काटेरी झाडी होती.त्या झाडांनी अतिशय "प्रेमाने" आमचे स्वागत केले आणि हातापायावर "कुरवाळले".तिथून पुढे वर जाणे शक्य नव्हते आणि पुढे जाणे पण शक्य नव्हते म्हणून आम्ही थोडे खाली आलो आणि आम्हाला डांबरी रस्ता मिळाला.समोर सिंहगड होता.आता शेवटचे(?) ३-४ किमी राहिले होते.पण ह्या वेळेस ती पूर्ण चढाई होती.











मजल-दरमजल करत आम्ही सिंहगडाच्या पार्किंग पर्यंत येऊन पोहोचलो.पुढे जाऊन आम्ही मुख्य दरवाज्याजवळ जाऊन बसलो.त्या वेळेस पहाटेचे ५ वाजले होते.आम्हाला चढाई सुरु करून ७ तास झाले होते.खूप दमछाक झाली होती आणि आता पाणी पण संपले होते.त्यामुळे एक-च इलाज होता कि गडाच्या माथ्यावर जाऊन पाणी आणायचे किंवा इथे-च वाट बघत थांबायचे.थंडी जाणवायला लागली होती त्यात सौरभ आणि अमितने एका रिकाम्या लिंबू सरबताच्या टपरीमध्ये झोपण्याची तयारी केली.आमच्याकडे अर्धा लिटर पाणी,थोडी बिस्किटे आणि 3 सफरचंद होती ती खाऊन आम्ही शेवटी वर गेलो.कोंधानेश्वर हॉटेल बंद होते आणि पुढची १-२ हॉटेल बंद होती.एका टपरीच्या आत जाऊन पाणी मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न फेल झाला.शेवटी वर गेल्यानंतर एका टपरी मध्ये उजेड दिसला आणि तिथे एक वयस्क जोडपे झोपले होते.त्यांनी आम्हाला पाणी दिले आणि चहा पण करून दिला.थोडे खाल्ल्यानंतर आम्ही १ तास झोपलो.मागून आलेल्या आमच्या ग्रुप ने आम्हाला उठवले आणि मग तिथून आम्ही बससाठी निघायचे ठरवले.



सूर्योदय पाहिला आणि पाटील तुरुतुरु पुढे निघाले ( तसे ते रात्रभर आम्हाला कमी-च दिसले ).आता मात्र माझ्या पायाने उत्तर दिले होते.पाय चालत तर होते पण १ तास झालेल्या झोपेने अजून-च त्रास झाला होता."केकू जास्त त्रास करून घेऊ नको.थोडे हळू ये" हा सल्ला मी त्यानंतर शेवटपर्यंत पाळला.पूर्ण ट्रेक मध्ये त्रास झाला नाही त्यामुळे शेवटी उगाच आगौपणा करण्यात अर्थ नव्हता.आम्ही सिंहगड उतरण्यास सुरुवात केली.अर्थातच मी सगळ्यात शेवटी होतो.सगळ्यांना उतरण्यास ३० मिनिट्स लागले असतील मी मात्र निवांत १ तास घेतला.खाली आलो तेव्हा बस लागली होती आणि सगळे लोक जमले होते.बस मध्ये बसल्यानंतरचा आनंद व्यक्त करता येत नाहीये इथे :)
सकाळच्या गार वातावरणात बस जशी पुण्याकडे निघाली तसा मनात एक-च विचार होता....परत ह्या ट्रेकला कधी यायला मिळेल !!